प्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका : राज गवई

khadse

एकीकडे अच्छे दिन व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारमुंड्याचीत करुन भाजपीय महायुतीचे सरकार सत्तेवर आले. शिवाय पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही भाजपाने यश प्राप्त करत शिवसेनेच्या सोबतीने  महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापन होताच “ना खाऊँगा और ना खाने दुंगा” असा नारा देत ‘बारा ते अठरा घंटे’ काम करणार्‍या मोदी व  त्यांच्या सरकारने काही काळ जनतेच्या नजरेत धुळफेक करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वीही झाले. पण घोटाळे उघडकीस आले नाहीत याचा अर्थ घोटाळे झालेच नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही.
हरियाणातील खट्टर सरकार सत्तेवर येताच सहा महिन्यात दोन हजार कोटीचा घोटाळा झाला होता. पण मोदीच्या मर्जीतील खट्टर असल्या कारणास्तव त्यांचे काहीही बालबाका झालेले नाही.
परंतू..

महाराष्ट्रात भाजपा सरकार सत्तेवर येताच दिवंगत भाजप नेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व महाराष्ट्र राज्य  महिला व बालकल्याण मंत्री तसेच वंजारी समाजाचे व बीड जिल्ह्य़ातील बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा “चिक्की घोटाळा” उघडकीस आला होता. त्यापाठोपाठच शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा डिग्रीचा घोळ उघडकीस आला. आणि आज महाराष्ट्रातील आत्ताच्या भाजप प्रणित सरकार मधील महत्वाच्या महसूल मंत्रीपदावर असलेले एकनाथ खडसे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायची वेळ येऊन ठेपली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावलेले आहेत; त्यात प्रामुख्याने दाऊदशी संबंध, पुणे भोसरीतील एमआयडीसी जमिन खरेदी असो वा जावयाची लिमोझिन गाडी असे आरोप असतील. गेल्या आठवड्यापासून एकनाथ खडसे व आरोपांच्या मालिकेनी प्रसारमाध्यमे ढवळून निघाले आहेत. अखेरीस आज खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

शिवाय गिरीश महाजन यांचा घोटाळा याशिवाय कालपरवाला किरीट सोमय्यांचा देखील एक घोटाळा उघडकीस आला आहे, परंतु त्याची वाच्यता कोणत्याच प्रसारमाध्यमांमध्ये नाही. असे का ?
या प्रस्थापित पक्षामध्ये बहुजन नेतृत्व का टिकू शकत नाही ? याशिवाय भ्रष्टाचार असो वा इतर आरोपांच्या कात्रीत बहुजनच कसे सापडतात..?
इतिहासाचे पाने उलघडली तर दिसेल की, बंगारु लक्ष्मण सारख्या दलित माणसाला पोस्टरबाॅय म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तर केले होते, पण “ऑपरेशन धृतराष्ट्रा”च्या नावाखाली एक लाखाच्या लाचखोरी प्रकरणात कशी खेळी भाजपाने खेळली होती हे आपण भारतवासी जाणून आहोत. त्यानंतर आत्ताच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे कट्टर दावेदार असलेले व महाराष्ट्रातील भाजपात असुनही बहुजन नेता म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांची आपबीती जाणकारांना विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
भाजपा सोडले तर काँग्रेसने पण यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या मराठी माणसाला तसेच हिमालयाला धावून जाणाऱ्या व प्रधानमंत्री होण्याची आस लावून बसणाऱ्या सह्याद्रीच्या पदरी काय पडले होते, हे देखील आपण जाणून आहोत.
भुतकाळातील हुतात्मा स्मारकाचा चबुतरा गोमुत्राने शुध्द करणारे शिवसैनिक व आजचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील नावाला बहुजन (नकली) नेतृत्व व मफलरमॅन छगन भुजबळ हे देखील त्यातलेच एक उदाहरण…!
माझा सवाल आहे या नामधारी बहुजन नेत्यांना त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत, दगडाखाली हात अडकेपर्यंत बहुजन असल्याची जाणीवच कशी होत नाही ? या तथाकथित बहुजन नेत्यांवर कारवाई झाली. होऊद्या..आरोपी असल्याचे निष्पन्न झाले तर कारवाई झालीच पाहीजे.

पण महत्वाचा मुद्दा हा आहे की, घोटाळे फक्त बहुजन नेतेच करतात का ? बहुजनेत्तर देखील घोटाळे करत असतीलच नाहीतर हे बाकीचे समाजकार्य करायले बसले तर नाहीतच. मग दाऊदशी फक्त एकनाथ खडसेंचेच सबंध आहेत का ? जे की अजून निष्पन्न झालेले नाहीत. सत्तर हजार कोटीचा जलसिंचन घोटाळा करणारे, पुर्ती घोटाळा करणारे खुशाल बाहेर फिरतात. दाऊदचा व्याही जावेद मियाँदाद खुशाल मातोश्रीवर पाहुनचार करतो. दाऊदला साखळी बाँबस्फोटातुन अडकण्या अगोदरच सुखरुप भारताबाहेर पाठवणारे व जे की आजही बिझनेस पार्टनर म्हणून काम करतात. आयपीएलचा गोंधळ काय आहे व कोण पैसा लावतो कोण कमावतो, कोणाचा किती हिस्सा हे काय आहे लोक जाणून आहेत. यातील कोण दोषी आहेत यांचाही शोध घ्यावा अस सरकारला सांगू इच्छितो. एकनाथ खडसेचा काॅल ट्रेस करुन, हॅक करुन दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांनो सनातनच्या रुद्र पाटलाचा काॅल ट्रेस करुन काय न्याय दिला दाभोळकरांना..?

नवल वाटते हे नेते कोणत्या तोंडाने स्वतःला बहुजन म्हणवून घेतात. छगन भुजबळ सेनेत असतांनाचे प्रताप महाराष्ट्राला माहिती आहेत. काल तर बहुजन म्हणवुन घेणार्‍या खडसेला अक्षरशः त्यांचेच लोक सरळसरळ फाशी द्या असे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. यांनी खरच बहुजन समाजाचा विकास केला का ? यांनी कोणत्या आधारावर स्वतःला बहुजन म्हणून घ्यावे ? यांना वाईट काळातच जात-समाज का आठवते, आणि हे तथाकथित बहुजन तरीही चूकलेली वाट सोडायला तयार नाहीत अस का ?

वास्तव पाहता आज मुठभरांच्या हातात बहुजनरुपी कठपुतल्यांची दोरी दिसत आहे. बहुजन समाज इष्ट त्या मुद्द्यापासून भरकटवून धार्मिक मुद्यांवर भडकवला जात आहे. रस्त्यावर उतरून आयुष्याची राखरांगोळी करुन घेणारा हा बहुजन समाजातीलच तरुण आहे. माझे ओबीसी मित्र मैत्रित टिच्चून मला सांगतात तुम्हाला ओबीसी पंतप्रधान चांगला वाटत नसला तरी आम्हाला अभिमान आहे. पण त्यांना जेव्हा ओबीसी शिष्यवृत्ती याच ओबीसी पंतप्रधानाच्या काळात बंद केल्या गेली असे सांगितले तर मेंढरासारखे खाली मान घालतात.
शोकांतिका आहे की जे नेते स्वतःला बहुजनांचे नेते म्हणवून घेतात त्यांनी बहुजन समाजाच्या हिताचे एकतरी ठोस कार्य दाखवाव.

एकनाथ खडसे प्रकरणावर आठवडाभर चाललेल्या तथाकथित आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीप्रमानेच सर्वांना विचारात टाकणारी गुगली टाकलेली दिसते आहे.
बाळासाहेबांची भूमिका पाहता कोणालाही प्रथमतः हेच वाटणार की ते खडसेंचे समर्थन करत आहेत. पण वास्तव अस आहे की त्यांच्या मते खडसेंवर फक्त आरोप आहेत जे की खोटे देखील असु शकतात.
असेच आरोप करत अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्या “पुर्ती घोटाळ्याच्या” वेळी देखील ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा केला होता; परंतु नंतर काय झाले ? त्यांच्या मते या आरोपात काय तथ्य आहेत, ते समोर यायला पाहिजेत.

खडसेंच्या पुण्यातील जमिनीच्या खरेदी व्यवहार घोटाळ्यावर बोलायचे झाले तर मुळात पुणे शहरातील, पिंपरी चिंचवड, भोसरी, वाकड सारख्या भागातील जमिनी ह्या वतनाच्या, रामोशींच्या, ब्रिटिशांच्या आहेत हे खरे मालक या जमीनीचे आहेत. शिवाय ह्या जमिनी बिना “लँड अॅक्विजिशन”च्या (भूसंपादन) घेतल्या  गेलेल्या आहेत.
दुसरा जो आरोप खडसेंवर लावला जातोय दाऊद संभाषणाचा त्यावर बाळासाहेब आंबेडकर सांगतात;
मी राज्यसभेत 1990-96 च्या काळात असे बरेच राजकीय नेते संपवताना पाहीले आहे. मी स्वतः राजीव शुक्लाबद्दलचे सबळ पुरावे दिले होते पण कारवाई झाली नाही. पुढे ते म्हणतात जर प्रिती मेनन व हॅकर्स यांनी गोळा केलल्या पुराव्यात असे म्हटल्या गेले की पाच विविध फोनकाॅल्स केले गेलेत तर त्यातील ते पाच क्रमांक कोणाचे आहेत ? ते क्रमांक फक्त बाहेर आणले जावे त्याबरोबर फोनवरील संभाषण देखील “पब्लिक डोमेन” मध्ये आणावे. न्युज चॅनेल्सवर ते पुरावे दाखवावे व संभाषण जनतेला ऐकवायला पाहिजे.
राहीला प्रश् बहुजन नेतृत्वाचा. यावर बाळासाहेब पुढे बोलताना म्हटले खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये. तसा आधार घेतल्यास त्यांचा छगन भुजबळ व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका ही छुपी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी सवाल हाच आहे की बहुजन समाज हा कुठपर्यंत असाच शिकार होत राहणार ? मानसिक गुलामीतुन तो मुक्त होऊन प्रस्थापितांची साथ सोडून “Use And Throw” ही संकल्पना बहुजनांसाठीची कधी चूकीची ठरवतील ही प्रतिक्षा आहे..!

-राज गवई

rajsaru91@gmail.com

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s