डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता.

2

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गांधिजि, पंडित नेहरु, सरदार पटेल आणि संपुर्ण काॅंग्रेस सोबत असलेले वितुष्ट लक्षात घेतल्यास काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारताची घटना लिहिण्याचे कार्य का सोपविले याबद्दलचा खरा ईतिहास अनेकांना माहिति नाहि. काॅंग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे  ‘भारताचे संविधान एका अस्पृष्याच्या हातुन लिहिले जावे’ अशि गांधिजिंचि इच्छा होति म्हणुन काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे संविधान लिहिण्याचे कार्य सोपविले होते. काॅंग्रेसचा हा दावा आंबेडकरवाद्यांना मान्य नाहि. आंबेडकरवाद्यांच्या मते,इतर कुठलाहि पर्याय नसल्यामुळे काॅंग्रेसला नाईलाजाने संविधान लिहिण्याचे कार्य बाबासाहेबांकडे सोपवावे लागले होते. काॅंग्रेस करित असलेला दावा खरा कि आंबेडकरवाद्यांचा दावा खरा, हे जाणुन घेण्यासाठि १९४६ मध्ये झालेल्या प्रांतिक विधीमंडळाच्या निवडणूकांपासून तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितिवर अध्यक्ष म्हणुन निवड होण्यापर्यंतचा इतिहास माहिति करुन घेणे गरजेचे आहे.

                         जानेवारी १९४६ साली प्रांतिक विधीमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये शेकाफे(शेड्युलड कास्ट फेडेरेशन) ने पूर्ण भारतातून ५१ जागा लढविल्या होत्या. या निवडणुकीत शेकाफेला भयानक पराभवाला सामोरे जावे लागले होते. लढविलेल्या ५१ जागांपैकी बंगाल मधुन महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल हे आणि सिपि अॅंड बेरार या प्रांतातुन आर.पि.जाधव हे दोनच उमेदवार निवडुन आले होते. संयुक्त मतदारसंघांचा फायदा उचलून कॉंग्रेसने शेकाफेला पराजित केले होते. पुढे १९४६ च्या मार्च महिन्यात कॅबिनेट मिशन भारतात आले. कॅबिनेट मिशनवर भारताचे संविधान कश्याप्रकारे तयार करावे आणि संविधान सभेतील सदस्यांची निवड कशी व्हावी हे ठरविण्याचि जबाबदारि होती. कॅबिनेट मिशनने संविधान सभेच्या आपल्या योजनेत मुस्लिम व  शिखांना स्वतंत्र्य प्रतिनिधित्व देण्याचे घोषित केले आणि खुल्या वर्गात हिंदू , क्रिश्चन आणि अंग्लो इंडीयन यांच्या सोबत अस्पृश्यांना ठेवले. मिशनच्या योजने प्रमाणे संविधान सभेतील सदस्यांची निवडणूक हि प्रांतिक विधिमंडळात निवडून आलेल्या सदस्यांनी करावी असे ठरविण्यात आले होते. अस्पृश्य वर्गास या योजने अनुसार संविधान सभेत स्वतंत्र्य प्रतिनिधित्व न देण्यात आल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या योजनेचा विरोध केला होता. पण विरोधाला न जुमानता ब्रिटीश सरकारने कॅबिनेट मिशनच्या या योजनेद्वारेच संविधान सभेतील सदस्यांची निवड करण्याचे ठरविले होते.

                   प्रांतिक विधिमंडळ निवडणुकांमध्ये शेकाफेचे दोनच उमेदवार निवडून आल्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जाणे अशक्यप्राय झाले होते. अश्या वेळेस बंगाल प्रांतिक निवडणुकांमध्ये शेकाफे तर्फे निवडून आलेल्या जोगेन्द्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना बंगाल मधून संविधान सभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आणि निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा स्वतःच्या खांद्यावर घेतली. जोगेन्द्रनाथ मंडल यांच्या आग्रहानुसार बाबासाहेबांनी बंगाल मधून संविधान सभेची निवडणूक लढविण्याचे ठरविले पण हि निवडणूक एवढी सोपी नव्हती कारण कॉंग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभेत न येऊ देण्यासाठी कंबर कसलेली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर सरळच म्हटले होते कि “आम्ही डॉ.आंबेडकरांसाठी संविधान सभेचे दरवाजे आणि खिडक्याच नव्हे तर तावदानदेखील बंद केली आहेत, पाहतो तेथे डॉ. आंबेडकर कसा प्रवेश करतात ते.”

              १७ जुलाई १९४६ या दिवशी संविधान सभेची निवडणुका होणार होती. कोणत्याही परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जिंकू नये म्हणून कॉंग्रेसने व्हिप काढून कॉंग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी इतर कुठल्याही उमेदवारास मतदान करू नये असे बजावले होते. बंगाल प्रांतिक विधीमंडळात शेकाफेचा एकच सदस्य होता आणि संविधान सभेची निवडणूक जिंकण्यासाठी बाबासाहेबांना ५ मतांची गरज होती. अश्या वेळी जोगेन्द्रनाथ मंडल यांनी कॉंग्रेसच्या काही अस्पृश्य सदस्यांना आणि काही अपक्ष सदस्यांना बाबासाहेबांना मतदान करण्यास तयार केले. कॉंग्रेसचे एक सदस्य ग्याननाथ बिस्वास हे बाबासाहेबांना खूप मानायचे ते स्वताहून त्यांना मतदान करायला तयार होते. निवडणुकीच्या दिवशी निवडणुकीत दगाफटका होऊ नये या काळजीपोटी कोलकाता मधील नमोशुद्र आणि पंजाबी अस्पृश्यांनी बंगाल विधिमंडळास घेराव घातला होता. निवडणुकीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसच्या ५ अस्पृश्य सदस्यांनी पक्षाचा व्हिप झुगारून मतदान केले होते. २० जुलाई १९४६ ला निवडणुकीचा निकाल घोषित झाला. पहिल्या पसंतीची ७ मते मिळवून बाबासाहेब निवडून आले होते. बाबासाहेबांना कॉंग्रसचे बंगाल मधील सर्वात मोठे नेते असलेल्या सरत चंद्र बोस(सुभाष चंद्र बोस यांचे मोठे बंधू) यांच्या पेक्षाही जास्त मते मिळाली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत जाण्यापासून रोखण्याचे कॉंग्रेसचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले होते. जोगेंद्रनाथ मंडल यांच्या नेतृत्वातील बंगाल शेकाफेच्या युनिटने हा अशक्यप्राय विजय खेचून आणला होता. या यशाचा जल्लोष अस्पृश्यांनी कोलकाता शहरात मोठी मिरवणूक काढून साजरा केला होता.

                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश झाला होता. पण संविधान सभेतील बाबासाहेबांचे अस्तित्व जास्त काळ राहू शकले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा बाबासाहेब बंगाल मधील ज्या खुलना आणि जेसोर मतदार संघातून संविधान सभेवर निवडून गेले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीत पाकिस्तान(आता बंगलादेश) मध्ये गेला होता. मतदार संघ पाकिस्तानात गेल्यामुळे बाबासाहेबांचे संविधान सभेतील सदस्यत्व संपुष्टात आले होते. आता शेकाफेचा एकही प्रतिनिधी संविधान सभेत नव्हता. संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेतून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बाहेर झाले होते.

                  हे सर्व सुरु असताना तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांनि संविधान तयार करण्याचि तयारि सुरु केलि होति. भारताचे संविधान भारताबाहेरिल संविधान तज्ञांकडुन लिहुन घ्यावे अशि पंडित नेहरु यांचि इच्छा होति. त्यासाठि नेहरुंनि भारताबाहेरिल अनेक संविधान तज्ञांशि संपर्क साधला होता पण सर्वांनि भारताचे संविधान लिहिण्याच्या कार्यास असमर्थता दर्शविलि होति. जगातिल अनेक देशांचे संविधान लिहिणारे सर विलियम इवोर जेनिंग्स हे त्यापैकि एक. जेंनिंग्स यांनि भारताचे संविधान लिहावे यासाठि नेहरुंनि त्यांचि बहिण विजयालक्ष्मि नेहरुंना जेंनिग्स यांचि भेट घेण्यास पाठविले होते. सर जेनिंग्स यांनि या कामासाठि भारतातिल लोकं सक्षम असतांना त्यांच्याकडुनच संविधान का लिहुन घेत नाहि असा उलट प्रश्न केला. जेनिंग्स यांनि संविधान लिहिण्यास सक्षम असलेल्या तिन भारतियांचि नावे सुध्दा सांगितलि.
१.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
२.तेजबहादुर सप्रु
३.एम.आर.जयकर
विदेशातिल सर्व तज्ञांनि नकार दिल्यावर नेहरुंनि तेजबहादुर सप्रु यांच्याशि संपर्क केला पण सप्रु यांनि याकामास नकार दिला. सप्रु यांच्या कडुन नकार मिळाल्यावर नेहरुंनि जयकर यांच्याशि संपर्क साधला पण जयकर यांनि सुध्दा प्रकृति अस्वस्थतेचे कारण देउन संविधान तयार करण्यास नकार दिला. आधि विदेशातिल आणि मग भारतातिल तिन पैकि दोन तज्ञांनि नकार दिल्यावर भारताचे संविधान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडुन तयार करुन घेण्याशिवाय नेहरुंकडे दुसरा कोणताहि पर्याय उरला नव्हता. यासाठि नेहरुंना गांधिजिंचि परवानगि घेणे हि आवश्यक होते. नेहरुंनि गांधिजिंचि भेट घेउन त्यांना सर्व हकिकत सांगितलि तेंव्हा गांधिजिंना सुध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला होकार द्यावा लागला. पण एक अडचन अजुन होति देशाच्या फाळणिमुळे बाबासाहेबांचे संविधान सभेतिल सदस्यत्व संपुष्टात अाले होते. तेंव्हा बाबासाहेबांना पुन्हा संविधान सभेवर घेण्यात यावे असे ठरले. संविधान सभेतिल कुठलिहि जागा रिकामि नसल्यामुळे प्रकृतिने अस्वस्थ असलेले जयकर जे मुंबईतुन सभेचे सदस्य होते त्यांनि स्वत:हुन आपलि जागा सोडलि. मुंबईतिल जयकर यांच्या राजिनाम्यामुळे रिकामि झालेल्या जागेवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेत निवड करण्यात आलि. संविधान सभेत बाबासाहेबांचा प्रवेश झाल्यानंतर २९ आॅगस्ट १९४७ रोजि सात सदस्य असलेलि मसुदा समिति(Drafting Committee) स्थापन करण्यात आलि आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना या समितिचे अध्यक्ष बनविण्यात आले. मसुदा समितीचा पूर्ण कारभार एकट्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या खांद्यावर घ्यावा लागला होता.मसुदा समितिने २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवसात संविधान बनविण्याचे कार्य पुर्ण केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजि संविधान सभेने भारताचे संविधान मान्य केले. आणि २६ जानेवारी १९५० पासून भारताचे संविधान लागू झाले.

                    वरिल माहिति वरुन स्पष्ट पणे लक्षात येते कि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करावे अशी कॉंग्रेसची इच्छा असती तर कॉंग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभेच्या निवडणुकिमध्ये पराभूत करण्याचे प्रयत्न केले नसते , कॉंग्रेसने भारताबाहेरील संविधान तज्ञांना संविधान तयार करण्याचा आग्रह केला नसता आणि बाबासाहेबांच्या आधी तेजबहादूर सप्रू आणि जयकर यांना सुद्धा संविधान तयार करण्याचा आग्रह केला नसता. काॅंग्रेस डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान तयार करण्याच्या कुठल्याहि प्रक्रियेत सामिल करु इच्छित नव्हति. पण कुठलाहि पर्याय न उरल्यामुळे काॅंग्रेसला भारताचे संविधान तयार करण्याचे कार्य नाईलाजाने बाबासाहेबांकडे सोपवावे लागले.  काॅंग्रेस आजहि लोकांना खोटचं सांगते आहे कि, गांधिजिंचि इच्छा होति म्हणुनच बाबासाहेबांना संविधान तयार करण्याचे कार्य सोपविण्यात आले होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडी मागील सत्य आता लोकांना कळायला लागले आहे पण तरीही कॉंग्रेस निर्लज्जपणे खोटाच प्रचार करत आहे. काॅंग्रेसने आता हा चुकिचा प्रचार करणे थांबवावे अन्यथा काॅंग्रेसला इतिहासजमा होण्यास जास्त काळ लागणार नाहि.

सुमित वासनिक.

sumit.wasnik@outlook.com

 

4 thoughts on “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता.

  1. Pingback: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता. | Mumbai Varta

Leave a reply to nitin Cancel reply